शिरगाव येथे होणाऱ्या ‘ग्लोबल कोकण बीच महोत्सवा’ला शासन अनुदान देऊ नये-सुजित पाटील यांची ठाम मागणी

 नदीम शेख,पालघर


मौजे शिरगाव, ता. जि. पालघर येथे कोकण भूमी प्रतिष्ठान या खाजगी संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ग्लोबल कोकण बीच महोत्सवा’त स्टॉलधारकांकडून भाडे आकारणी तसेच ऐतिहासिक नाटकासाठी तिकीट विक्री सुरू असल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सुजित पाटील यांनी जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कडक शब्दांत निवेदन सादर करत, सदर महोत्सवाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान देऊ नये, अशी ठाम मागणी केली आहे.



निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिरगाव येथे होणारा महोत्सव पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त असला तरी आयोजकांकडून स्टॉल भाडे आकारणी केली जात असून ‘राजा रयतेचा’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटकासाठी तिकीट विक्री केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी नाटकातून समाजप्रबोधन व्हावे, अशा कार्यक्रमासाठी तिकीट आकारणी करणे अत्यंत अनुचित व आक्षेपार्ह असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.


“ऐतिहासिक आणि राष्ट्रप्रेरणादायी कार्यक्रमांच्या नावाखाली व्यावसायिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्यास शासनाने अशा उपक्रमांना पाठबळ देऊ नये,” असा ठोस इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

याउलट, शिरगाव गावाच्या कायमस्वरूपी विकासासाठी व पर्यटनवृद्धीसाठी समुद्रकिनारी प्रकाशव्यवस्था, पथमार्ग विकास, दमणच्या धर्तीवर विद्युत रोषणाईसह बंधारे उभारणी, तसेच स्वयंभू शिवमंदिराच्या तलावाचे सुशोभीकरण यांसारख्या कामांवर निधी खर्च केल्यास शिरगाव हे पालघर जिल्ह्यातील एक आदर्श व रमणीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते, असे मत सुजित पाटील यांनी मांडले आहे.


दरम्यान, या निवेदनामुळे शिरगावातील महोत्सव व त्यास मिळणाऱ्या शासकीय मदतीबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post