नदीम शेख, पालघर
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मेढवण खिंडीतील दाट जंगल परिसरात मुंबईतील माजी फुटबॉलपटू सागर सोरटी (35) याचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महामार्गापासून अवघ्या वीस मीटर अंतरावर त्याचा मृतदेह पडलेला स्थानिकांच्या लक्षात आला आणि तत्काळ कासा पोलिसांना माहिती देण्यात आली. कासा पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
सागर सोरटीने 19 वर्ष वयोगटासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर फुटबॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो मागील दोन वर्षांपासून मानसिक तणावाखाली होता. 15 नोव्हेंबर रोजी "पुणे येथे फुटबॉल खेळण्यास जात आहे" असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर त्याचा कुटुंबीयांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. दोन दिवसांच्या शोधानंतर 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मेढवण खिंडीतील जंगलात त्याचा मृतदेह सापडला.
या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, पंधरा दिवसांवर असलेल्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी नवीन कपडे शिवण्यास सागरने नकार दिल्याची माहितीही नातेवाईकांकडून समोर आली आहे. त्याच्या मानसिक तणावाचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. “शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल,” अशी माहिती पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली. या प्रकरणाचा तपास कासा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
