नदीम शेख,पालघर
"एकच लक्ष्य, शहरे स्वच्छ" या ब्रीद वाक्याला अनुसरून स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत नवनाथ वाठ, संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर नगर परिषदेच्या मार्फत भगिनी समाज संस्था संचालित प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेत 'कचरा व्यवस्थापन' या विषयावर विद्यार्थ्यांसाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक यांनी केले. 'कचरा व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शक ओमकार जाधव आणि सत्यजित निकम यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या अभियानात इयत्ता १ली ते ७ वी तील जवळपास आठशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
जनजागृतीपर अभियान कार्यक्रमात कचरा निर्मिती, कचऱ्याचे विविध प्रकार, कचर्यावरील उपाययोजना, प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार व उपाय योजना, चांगल्या व वाईट सवयी, फाईव्ह आर आदी विषयांवर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कचऱ्याच्या प्रकारानुसार रंगनिहाय कचराकुंड्यांचा वापर करण्याचे आवाहन केले. टाकाऊ पदार्थांपासून बनवलेल्या टिकाऊ पिशव्या शाळेला भेट म्हणून देण्यात आले.
🪣 कचऱ्याचे पाच प्रकार
🟢 ओला कचरा- हिरवी कचराकुंडी
🔵 सुका कचरा- निळी कचराकुंडी
🔴घरगुती घातक कचरा- लाल कचराकुंडी
⚫ सॅनिटरी कचरा- काळी कचराकुंडी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेतील शिक्षक दर्शन भंडारे यांनी केले.